'केशवकुंज' येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक

    23-Jun-2025   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक यावर्षी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली असून येथील 'केशवकुंज' संघ कार्यालयात होणार आहे. देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सह-प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सह-क्षेत्र प्रचारक या तीन दिवसीय (४,५ व ६ जुलै) बैठकीत उपस्थित राहतील.

संघाच्या संघटनात्मक रचनेत एकूण ११ क्षेत्र आणि ४६ प्रांत निर्माण करण्यात आले आहेत. या बैठकीत संघ प्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री देखील सहभागी होतील. गेल्या मार्चमध्ये संपन्न झालेल्या अ.भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर, देशभरात एप्रिल, मे आणि जून महिन्यात विविध स्तरावर संघाचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाले. त्यानंतर आगामी योजनेच्या अंमलबजावणीची रूपरेषा आखण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

बैठकीत संघाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गांचा अहवाल आणि आढावा, आगामी शताब्दी वर्षासाठी नियोजित विविध कार्यक्रमांच्या योजनांची अंमलबजावणी, पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा २०२५-२६ या वर्षासाठीचा प्रवास आराखडा यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. संघ शताब्दी वर्ष (२०२५-२६) चे कार्यक्रम येत्या विजयादशमीपासून म्हणजेच ०२ ऑक्टोबर पासून सुरू होतील आणि पुढील वर्षी विजयादशमी २०२६ पर्यंत सुरू राहतील.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सहा सह-सरकार्यवाह यांच्यासह अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य या बैठकीत सहभागी असतील. बैठकीच्या निमित्ताने सरसंघचालक दि. २८ जून रोजी दिल्लीत येतील.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक