
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इराण-इस्रायल युद्धादरम्यान सीरियातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सीरियाच्या दमास्कसमधील एका चर्चमध्ये भीषण आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. रविवार, दि. २२ जून रोजी 'सेंट इलियास चर्च'मध्ये प्रेयर (प्रार्थना) सुरु असतानाच हा हल्ला झाला. हल्लेखोराने प्रथम चर्चमध्ये गोळीबार केला आणि नंतर स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात किमान २२ लोक ठार आणि ६३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सनेही हल्ल्याची पुष्टी केली.
सीरियन सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आत्मघाती हल्ल्यानंतर सरकारकडून घटनेचा तपास सुरु आहे. अशी माहिती आहे की, हल्लेखोराने सर्वप्रथम चर्चमध्ये प्रवेश केला, तिथे उपस्थित असलेल्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि नंतर स्फोटक जॅकेटने स्वतःला उडवून दिले. त्यानंतर तिथे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. चर्चमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच, अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही मदत आणि बचाव कार्यासाठी तेथे पोहोचले. दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या एका आत्मघातकी बॉम्बरने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.