मरीन लाईन्समध्ये मोठी आग! चार जणांची सुखरूप सुटका; काय घडलं?

23 Jun 2025 17:20:00

मुंबई : मुंबईत मरीन लाईन्स परिसरात एका इमारतीत मोठी आग लागली. सोमवार, २३ जून रोजी दुपारी १२:२६ वाजता 'मरीन चेंबर्स' या इमारतीत पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. ही इमारत झाफर हॉटेलजवळ आणि गोल मशीद शेजारी आहे. फ्लॅट क्रमांक ५०२ मध्ये ही आग लागली. लाकडी फर्निचर, वायरिंग, गॅस ट्यूब, गादी, छत आणि घरातील इतर वस्तूंमुळे आग पसरली.

तातडीची मदत आणि बचाव कार्य

घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे तीन ते पाच बंब आणि पाण्याचे टँकर पाठवण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी लोकांना बाहेर काढले. चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश होता. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. ही आग 'लेव्हल १' प्रकारातील घोषित करण्यात आली आहे. अग्निशमन दलाने सव्वा दोनवाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करण्यात आले.

आगीचे कारण काय?

या आगीत केवळ पाचव्या मजल्यावरील फ्लॅटचे नुकसान झाले असून इतर मजल्यांवर धूर पसरला, पण आग तिथपर्यंत पोहोचली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, विजेच्या वायरिंगमुळे ही आग लागली असावी. मात्र, अधिकृत कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

Powered By Sangraha 9.0