अयोध्येच्या धर्तीवर बिहारमध्ये उभारणार भव्य 'माँ जानकी मंदिर'

23 Jun 2025 14:41:00

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीतामढी येथील पुनौराधाम मंदिराभोवती पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ५०.५० एकर जमिनीच्या अधिग्रहणाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, माँ जानकीचे जन्मस्थान असलेल्या पुनरौधामच्या व्यापक विकासासाठी भव्य मंदिरासह इतर वास्तूंचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

अशी माहिती आहे की, मंदिरात सीतामातेची भव्य मूर्ती असून, भगवान हनुमानाची १०८ फूट उंच मूर्तीही उभारण्याची योजना आहे. मंदिराचे प्रस्तावित मॉडेल शेअर करत नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांसाठी ही सौभाग्याची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. सीतामातेच्या मंदिर बांधकामासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. अयोध्येच्या धर्तीवर सीतामढीचे पुनौराधाम विकसित केले जात आहे. मंदिराला राष्ट्रीय महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ बनवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. जानकी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे ५० एकर जमीनही संपादित करण्यात आली आहे.


माता जानकीचे हे मंदिर सीतामढीतील पुनौरा गावात आहे. त्यामुळे त्याला पुनौराधाम असेही म्हणतात. पुनौराधाम बिहारमधील अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ते पाटणा विमानतळापासून सुमारे १५० किमी अंतरावर आहे. मुजफ्फरपूर रेल्वे स्टेशनपासून त्याचे अंतर सुमारे ६०-७० किमी आहे. हे ठिकाण दरभंगा, मधुबनी आणि सीतामढी यांसारख्या मिथिलाच्या मुख्य भागांजवळ आहे. बिहारमधील अनेक शहरांमधून पुनौराधामला सहज पोहोचता येते. हे दरभंगा, मधुबनी आणि सीतामढी सारख्या भागांच्या जवळ आहे.


Powered By Sangraha 9.0