लेन्सच्या झरोक्यातून...

Total Views |


आपल्या आवडीचे क्षेत्र निवडत मिळालेल्या अनुभवातून स्वतःचे स्टार्टअप सुरू करत यशस्वी वाटचाल करणार्‍या पालघरमधील ‘सिम्युल मोशन स्टुडिओ कंपनी’चे संस्थापक सौरभ राऊत यांच्याविषयी...

महाराष्ट्रात आज अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत.यापैकी अनेक प्रकल्प हे त्याच्या आयकॉनिक रचना, वैशिष्ट्ये यांसाठी प्रसिद्ध आहेत. असे प्रकल्प भारतातच पहिल्यांदाच उभारण्यात येत आहेत. आपण समाजमाध्यमांतून आज प्रत्येकच प्रकल्पांची सुंदर छायाचित्रे आणि विहंगम दृष्ये, चित्रफितीच्या स्वरूपात बघतो. प्रकल्पांच्या कामात पारदर्शकता ठेवण्यासोबतच नागरिकांना प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा मिळावा, हाच एकमेव हेतू या माहितीच्या प्रदर्शनामध्ये असतो. मात्र, हीच व्यावसायिक संधी ओळखत, पालघर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील सौरभने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ‘सिम्यूल मोशन स्टुडिओ’ही कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या, विविध प्रकल्पस्थळांचे छायाचित्रण आणि व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करते.

सौरभ अनिल राऊत डहाणूमधील चिंचणी येथील एक यशस्वी उद्योजक.सौरभचे शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले असल्याने, त्याला अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान दोघांचीही उत्तम समज आहे. याच क्षेत्रात स्वतःचे काहीतरी असावे, यातूनच त्याने ‘सिम्युल मोशन स्टुडिओ’ या कंपनीची स्थापना केली. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असल्याने, कंपनीला आपल्या ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि उत्तम सेवा देणे सोपे झाले. 2023 साली स्थापन झालेल्या ‘सिम्युल मोशन’च्या उदयामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे, स्टुडिओज हे ‘व्हीएफएक्स’, ‘सीजीआय’, सर्जनशील आणि चित्रपट निर्मिती उद्योगातील इलस्ट्रेट्यूव्ह आवश्यकतांमधील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एकच उपाय आहे. तसेच, अ‍ॅनिमेटेड चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःची उत्पादने प्रकाशित करण्यासाठी एक स्वतंत्र अ‍ॅनिमेशन आणि मोशन स्टुडिओ असणेही आवश्यक आहे. सौरभ पालघरमधील तरुणांना पालघरमध्येच कामाच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहेत, जे आज फक्त मुंबई महानगरीय भागातच उपलब्ध आहे.

सौरभच्या कंपनीची पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट प्रकल्पांसाठी उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ उत्पादन, अ‍ॅनिमेशन आणि छायाचित्रण सेवा प्रदान करण्यात विशेषता आहे. हे करत असताना, सौरभ कथाकथनाची आवड आणि उत्कृष्टतता यांसह आकर्षक दृश्ये तयार करतो. जी अत्यंत कठीण प्रकल्पांना सोप्या आणि मूर्त स्वरूपात लोकांसाठी सादर करतात. सौरभचा ड्रोन शूटिंग, व्यावसायिक व्हिडिओ उत्पादन आणि तांत्रिक गोष्टी सोप्या करून सांगण्यात हातखंडा आहे. त्याच्या उत्कृष्ट कार्यशैलीमुळेच आज सौरभ आणि त्याची टीम भारतातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प साकारणार्‍या, ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’, पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीतील आघाडीची कंपनी ‘मेधा इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘भारतीय रेल्वे’, ‘महारेल’ आणि ‘मेट्रो’ प्राधिकरणांसारख्या आघाडीच्या संस्थांसाठी एक विश्वासार्ह भागीदार आहेत. ‘सिम्युल मोशन स्टुडिओज’च्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ पाहिल्यास, त्यात आश्चर्यकारक ड्रोन व्हिज्युअल्स, प्रभावी माहितीपट, औद्योगिक छायाचित्रण, अत्याधुनिक अ‍ॅनिमेशन आणि पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रसिद्ध क्लायंटसाठी तयार केलेले मनमोहक मजकूर दृष्टीस पडतात. आमच्या इन-हाऊस प्रॉडक्शन पोर्टफोलिओद्वारे ‘सिम्युल मोशन स्टुडिओज’च्या सर्जनशील कल्पकतेचा शोध घ्या, ज्यामध्ये मूळ माहितीपट, अ‍ॅनिमेशन आणि कथाकथन प्रकल्प आहेत, जे नवोन्मेष आणि दृश्य उत्कृष्टतेबद्दलची आमची आवड दर्शवतात, असे सौरभ सांगतो.

कंपनीच्या या संपूर्ण प्रवासाबाबत माहिती देताना सौरभ सांगतो की, “स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी मी माझे शिक्षण पूर्ण करून, दोन वर्षे मी माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याच फिल्डमध्ये काम केले. हे काम करत असताना मी माझ्या युट्यूबवर विविध प्रकल्पांचे व्हिडिओ तयार करून टाकत होतो. माझी ही आवड वाढतच होती. म्हणून मी एका मार्केटिंग कंपनीत रुजू झालो आणि तिथे अ‍ॅनिमेटर आणि व्हिडिओ एडिटर म्हणून काम सुरू केले. दोन वर्षे तिथे अनुभव घेऊन मी माझी स्वतःची कंपनी स्थापन केली. खरंतर स्वतःचा व्यवसाय असावा, याच मताचा मी होतो. त्यानुसार, मला माझी वाट या कंपनीच्या रूपात मिळाली. आम्ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक आणि कॉपोरेट कंपन्यांसोबतच काम करतो,” असे सौरभ आवर्जून सांगतो.

2013 सालापासूनच सौरभ युट्यूबवर फिल्म बनवत असे. आवश्यकतेनुसार सौरभ व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक बाबी जसे की, ड्रोन कॅमेरा, संगणक इतर कॅमेरा हे जमवत होता. त्यामुळे कोणतेही मोठे कर्ज उभे करून, व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता त्याला भासली नाही. 2017 साली युट्यूबकडून उत्पन्न सुरू झाल्याने कुटुंबाला ही खात्री पटली की, या क्षेत्रातही सौरभ यशस्वी काम करू शकतो. त्यामुळे कुटुंबानेही माझ्या कामात मला सहकार्य केल्याचे, सौरभ आवर्जून सांगतो. केंद्र सरकारने माझ्यासारख्या तरुणांच्या स्वप्नांना मोठे आर्थिक बळ देत, ‘एमएसएमई’ क्षेत्राला अनेक लाभ दिले आहेत. जेव्हा स्टार्टअप सुरू करावे, यासाठी ‘एमएसएमई’ कर्ज हा खूपच मोठा आधार आहे. त्यामुळे केंद्र सरकार एकप्रकारे यातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणाच देत आहे. ‘सिम्युल मोशन स्टुडिओ’ला अ‍ॅनिमेशन आणि मोशन स्टुडिओ म्हणून विकसित करण्याची सौरभची महत्त्वाकांक्षा आहे, जी प्रेक्षकांसाठी डॉक्युमेंटरीज, इन्फॉर्टेन्मेंट आणि अ‍ॅनिमेटेड मालिका तयार करेल. यातून नागरिकांना त्यांच्या सभोवताली सुरू असलेल्या घडामोडी आणि विशेषतः प्रकल्प जाणून घेण्यास मदत होईल. आगामी दहा वर्षांत माझा व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी माझ्यासमोर वाढवणच्या रूपात दिसते आहे. पालघरच्या तरुणांना अनेक संधी यानिमित्ताने मिळतील, असेही सौरभ आवर्जून सांगतो. सौरभची कंपनी ‘सिम्युल मोशन स्टुडिओ’ आज आकर्षक व्हिडिओ, आश्चर्यकारक छायाचित्रण किंवा अत्याधुनिक व्हिज्युअल सोल्यूशन्स देण्यासाठी यशस्वी वाटचाल करत आहे. सौरभला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.