परीक्षेत कमी गुण! शिक्षक बापाकडून जबर मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू
23-Jun-2025
Total Views |
सांगली : सांगली जिल्ह्यात मुलीला सराव परीक्षेत कमी गुण का मिळाले? अशी विचारणा करत तिच्या जन्मदात्या पित्यानेच तिला बेदम मारहाण केली. यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार, २० जून रोजी सांगलीतील आटपाडी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
साधना धोंडीराम भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने धोंडीराम भोसले यांनी साधनाला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी जबर होती की, यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विशेष म्हणजे धोंडीराम भोसले एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. साधनाला मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी योग दिन असल्याने धोंडीराम भोसले शाळेत निघून गेले. परंतू, घरी आल्यानंतरही साधना बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
साधना अभ्यासात अतिशय हुशार असून दहावीत ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली होती. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने खाजगी शिकवणी लावली होती. याच शिकवणीतील एका सराव परिक्षेत साधनाला कमी गुण मिळाल्याने तिच्या वडीलांनी तिचा जीव घेतला. दरम्यान, मुलीची हत्या केल्याप्रकरणी धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.