'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

    23-Jun-2025   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या 'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन' यावरील व्यवस्थापन लेख संकलन पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवा भारतीचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि संघाच्या सेवा कार्याशी संबंधित कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती. सदर कार्यक्रम किर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय सभागृह, काशिनाथ धुरू रोड, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात चित्राताई वेलणकर यांनी सादर केलेल्या संघटन मंत्राने झाली. यानंतर, मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाते प्रास्ताविक संजय मालकर यांनी केले. तसेच सेवा भारतीच्या कार्यशैली व कामगिरीवर आधारित एक माहितीपूर्ण व्हिडिओ आनंद राऊळ यांच्याद्वारे दाखवण्यात आला. तत्पश्चात राजेंद्र लोखंडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

राजेंद्र लोखंडे यांनी प्रकाशन झालेल्या पुस्तकाची वैशिष्ट्ये आणि त्यात असलेल्या उपयुक्त मार्गदर्शनाची माहिती दिली. प्रकाशित पुस्तकात आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात महानगरपालिका, सेवा भारती आणि एक हजारहून अधिक आपदा मित्र आणि आपदा सखी यांचे अनुभव समाविष्ट आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती विभागाचे संचालक सतीश खडके यांनी आपत्ती व्यवस्थापनातील सरकारची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले की राज्य आणि केंद्र सरकार आधुनिक उपकरणे आणि यंत्रणेद्वारे तयारी, संकट कमी करणे, मदत आणि पुनर्बांधणी यासारख्या टप्प्यांवर पद्धतशीरपणे काम करत आहेत.

सेवा भारती कोकण प्रांताचे अध्यक्ष विलास तावडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात आपले अनुभव सांगताना, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाला गती देण्याची गरज यावर भर दिला आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. सोमय्या विद्यापीठाचे प्र. कुलगुरू आणि कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. सतीश मोढ यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, आपत्ती व्यवस्थापनासाठी केवळ तयारीची आवश्यकता नाही तर कौशल्य आणि मूल्यांवर आधारित प्रशिक्षण देखील आवश्यक आहे. स्वयंसेवकांना स्वतःचे जीवन वाचवताना इतरांना मदत करण्यासाठी सतत प्रशिक्षण घ्यावे लागते. संघ गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रातील प्रशिक्षण, कार्यशाळा आणि पुस्तकांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक