रा. स्व. संघाची प्रांत प्रचारक बैठक दिल्लीत;  ४ ते ६ जुलै दरम्यान ‘केशवकुंज’मध्ये बैठक

    23-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली
: विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) वार्षिक अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारक बैठक यावर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आगामी ४, ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी आयोजित केली जात आहे. ही बैठक दिल्लीतील 'केशवकुंज' या संघ कार्यालयात होणार आहे.

देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सहक्षेत्र प्रचारक या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. संघाच्या संघटनात्मक रचनेत एकूण ११ प्रदेश आणि ४६ प्रांत आहेत. संघप्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री देखील या बैठकीत सहभागी होतील. गेल्या मार्चमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर देशभरात एप्रिल, मे आणि जून महिन्यात संघाच्या विविध स्तरांचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यानंतर आगामी योजनेच्या अंमलबजावणीच्या रूपरेषेच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

बैठकीत संघाच्या अलीकडेच संपलेल्या प्रशिक्षण वर्गांचा अहवाल आणि आढावा, आगामी शताब्दी वर्षासाठी नियोजित विविध कार्यक्रमांच्या योजनेची अंमलबजावणी, २०२५-२६ या वर्षासाठी सरसंघचालकांच्या प्रवास योजनेसारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. संघ शताब्दी वर्ष (२०२५-२६) चे कार्यक्रम येत्या विजयादशमीपासून म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतील आणि पुढील वर्षी विजयादशमी २०२६ पर्यंत सुरू राहतील.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, डॉ. कृष्णा गोपाल जी, सीआर मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये आदी सर्व सरकार्यवाह, सर्व अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, सह-प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक २८ जून रोजी बैठकीसाठी दिल्लीत पोहोचतील.